ज्येष्ठांच्या ११ प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार: आमदार मंदाताई म्हात्रे
बेलापूर:बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय सौ. मंदाताई म्हात्रे यांना फेस्कॉम (FESCOAM) मुंबई विभाग आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या ११ प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन आमदारांना सादर करण्यात आले.
फेस्कॉम मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. विकास साठे आणि सचिव श्री. अजय माढेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही भेट घेतली. यावेळी श्री. सुरेश पोटे यांच्या हस्ते आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या आजवरच्या कार्याचा गौरव करत, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
निवेदन स्वीकारताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठांच्या सर्व मागण्या व समस्या अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतल्या. “ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा मुख्य आधार आणि मार्गदर्शक आहेत,” असे सांगत त्यांनी फेस्कॉमच्या या ११ प्रलंबित मागण्या थेट मुख्यमंत्री स्तरावर मांडून त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करू, असे स्पष्ट आश्वासन दिले.
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या या सकारात्मक आणि आश्वासक भूमिकेमुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी.
9822548429





