शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; किराणा दुकानातील चोरीचा अवघ्या चार तासांत छडा, दोन आरोपी अटकेत:-
जि.धुळे, ता. शिरपूर :दी. 13 जुलै :-शिरपूर शहरातील अक्षद ट्रेडिंग किराणा दुकानात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत छडा लावत शिरपूर शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेली ₹१४ हजारांची संपूर्ण रोकड हस्तगत केली. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ जुलै २०२६ रोजी रात्री ८.३० ते ९ जुलै रोजी सकाळी ९.३० या कालावधीत फिर्यादी मनीष मोहनलाल अग्रवाल (रा. बोहरी गल्ली, बालाजी मंदिराजवळ, शिरपूर) यांच्या अक्षद ट्रेडिंग या किराणा दुकानातून अज्ञात चोरट्यांनी ₹१४ हजारांची रोकड चोरून नेली.
याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चार तासांत मतीन खलील तेली आणि मकसूद अख्तर मेहतर (दोघेही रा. लोहार गल्ली, शिरपूर) यांना ताब्यात घेतले.
सखोल चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ₹१४ हजार किमतीच्या ₹१००, ₹५०, ₹२०, ₹१०, ₹५, ₹२ आणि ₹१ मूल्याच्या एकूण २,०५९ चलनी नोटा व नाणी जप्त करण्यात आली. त्यामुळे चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रभावी कारवाईमुळे गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.






