पहिल्याच पावसात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याची दुरवस्था; घोणसपूर ग्रामस्थांची चौकशी व तातडीच्या दुरुस्तीची मागणी:-


पहिल्याच पावसात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याची दुरवस्था; घोणसपूर ग्रामस्थांची चौकशी व तातडीच्या दुरुस्तीची मागणी:-

जि. सातारा, ता. महाबळेश्वर :दी. 13 जुलै :-मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रजमा २६ ते घोणसपूर (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) या रस्त्याची पहिल्याच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.

RD-SAT(II)-A-256 या पॅकेजअंतर्गत सुमारे ४.७५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम १० जानेवारी २०२५ रोजी सुरू करण्यात आले होते. हे काम मे. उदय डी. जाधव कन्स्ट्रक्शन, रत्नप्रभा कन्स्ट्रक्शन व मंगलश्याम कन्स्ट्रक्शन (जे.व्ही.), वाई, जि. सातारा यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले.

मात्र जुलै २०२६ मध्ये झालेल्या पहिल्याच पावसात रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडणे, डांबरीकरण उखडणे आणि रस्त्याची झपाट्याने दुरवस्था होणे अशा प्रकारामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या नियमांनुसार या रस्त्यासाठी १० वर्षांची देखभाल व हमी देण्यात आल्याचे नामफलकावर नमूद असतानाही काही महिन्यांतच रस्ता खराब झाल्याने ही हमी केवळ कागदोपत्रीच राहिली का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

घोणसपूर हे गाव प्राचीन स्वयंभू शिवालय, शिवकालीन ऐतिहासिक मधू मकरंदगड आणि समृद्ध नैसर्गिक वारसा यामुळे प्रसिद्ध आहे. वर्षभर भाविक, गडभ्रमंती करणारे पर्यटक, ट्रेकर्स तसेच दुर्मिळ औषधी वनस्पतींचा अभ्यास करणारे देशी-विदेशी पर्यटक या परिसराला भेट देत असल्याने या रस्त्याला पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे.

गावातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून असून दैनंदिन दळणवळणासाठी हाच प्रमुख मार्ग आहे. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर आमदार मकरंद आबा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता मंजूर झाला. मात्र काही महिन्यांतच त्याची झालेली दुरवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

खराब रस्त्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून काही ठिकाणी रुग्णांना डोलीच्या साहाय्याने उपचारासाठी नेण्याची वेळ येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांनी या कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच कंत्राटातील अटींनुसार रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून दर्जेदार काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.

यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी घोणसपूर गावातील स्वयंभू शिवालय, ऐतिहासिक मधू मकरंदगड आणि परिसराच्या पर्यटन व धार्मिक महत्त्वाचा विचार करून संबंधित यंत्रणांना तातडीने आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!