पारध परिसरात हरणांचा वावर वाढल्याने शेतकरी त्रस्त


पारध परिसरात हरणांचा वावर वाढल्याने शेतकरी त्रस्त

सोयाबीन, मका, मिरचीसह कोवळ्या पिकांचे मोठे नुकसान; वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पारध प्रतिनिधी / महेंद्र बेराड : सध्या पावसाळ्यामुळे भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई व सावंगी अवघडराव परिसरातील शेतशिवार हिरवेगार झाले असून या परिसरात हरणांच्या कळपांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हरणे दिवसा तसेच रात्रीही शेतांमध्ये मुक्तपणे फिरत असल्याने भाजीपाला,सोयाबीन, मका, मिरची तसेच उडीद, मूग ,तूर इत्यादी इतर कोवळ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

हरणांचे कळप कोवळे अंकुर, पाने तसेच पिकांची वाढ होत असतानाच त्यांचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. यावर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मिरचीसह विविध नगदी पिकांची लागवड केली आहे. मात्र हरणांच्या सततच्या वावरामुळे या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार हरणांना इजा करणे, पकडणे किंवा मारणे हा दंडनीय व अजामीनपात्र गुन्हा असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. एकीकडे पिकांचे संरक्षण करायचे, तर दुसरीकडे कायद्याचे पालन करायचे, अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाने तातडीने या भागाची पाहणी करून हरणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीवर प्रभावी उपाययोजना कराव्यात, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी तसेच वन्यप्राण्यांचा शेतांतील वावर कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या या समस्येकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक आणि शेतकरी व्यक्त करीत आहेत.


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!