उल्हासनगरमध्ये एफडीएची मोठी कारवाई; ६१२ प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त
उल्हासनगर:महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरमधील एका म्हशीच्या गोठ्यावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६१२ प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त करण्यात आली असून, गोठा चालकाविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तपासादरम्यान दूध उत्पादन वाढवण्यासाठी म्हशींना बेकायदेशीररीत्या ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स दिली जात असल्याचे उघडकीस आले. ऑक्सिटोसिनचा अनधिकृत वापर जनावरांच्या आरोग्यासाठी तसेच मानवी आरोग्यासाठीही गंभीर धोकादायक मानला जातो. त्यामुळे एफडीएने हा साठा जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.
एफडीएने नागरिकांना अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळाल्यास तातडीने प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे. अन्न व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
9822548429







