मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; पादचाऱ्याचा मृत्यू, चालक-वाहक जखमी
मुंबई : मुंबईतील सायन–पनवेल महामार्गावर मानखुर्द येथील विश्वकर्मा रुग्णालयाजवळ रविवारी सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. सकाळी सुमारे ९.१४ वाजण्याच्या सुमारास भरधाव बेस्ट बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर जाऊन आदळली.
या अपघातात रस्ता ओलांडत असलेले भास्कर रावसाहेब पांडे (वय ६५) हे बसखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात बस चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (वय ५१) आणि वाहक वैभव वाघमारे (वय ४१) जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. चालकाचे नियंत्रण कसे सुटले, याचा तपास पोलीस करत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429






