नेरळ–माथेरान मिनी ट्रेन आता हायड्रोजन इंजिनावर धावणार; ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ उपक्रमात समावेश
माथेरान : पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेली आणि ‘माथेरानची राणी’ म्हणून ओळखली जाणारी नेरळ–माथेरान ऐतिहासिक मिनी ट्रेन लवकरच आधुनिक आणि पर्यावरणपूरक स्वरूपात धावताना दिसणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ उपक्रमांतर्गत या हिल रेल्वेचा समावेश करण्यात आला असून भविष्यात या मार्गावर हायड्रोजनवर चालणारे इंजिन वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुमारे २१ किलोमीटर लांबीच्या नॅरोगेज मार्गावर धावणारी ही ऐतिहासिक मिनी ट्रेन सध्या डिझेल इंजिनावर चालते. हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास कार्बन उत्सर्जनात मोठी घट होऊन पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे माथेरानच्या प्रदूषणमुक्त आणि निसर्गरम्य वातावरणाचे संरक्षण करण्यासही मदत होईल.
रेल्वे मंत्रालयाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे वारसा जपणाऱ्या रेल्वे मार्गांचे आधुनिकीकरण करण्यासह स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. नेरळ–माथेरान मिनी ट्रेन हायड्रोजन इंजिनावर धावू लागल्यानंतर पर्यटकांना अधिक शांत, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






