राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस खासदारांचे संसदेत काळ्या कपड्यांत आंदोलन; केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसच्या खासदारांनी बुधवारी संसदेत काळे कपडे परिधान करून केंद्र सरकारविरोधात जोरदार निषेध नोंदवला.
संसद भवन परिसरात जमा झालेल्या काँग्रेस खासदारांनी केंद्र सरकारच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना अशा प्रकारे ताब्यात घेणे ही थेट लोकशाहीची गळचेपी आणि हुकूमशाही प्रवृत्ती असल्याचे सांगत काँग्रेसने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला.
मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ काँग्रेसतर्फे आयोजित आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले होते. या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसने या घटनेच्या निषेधार्थ केवळ संसदेतच नव्हे तर देशभरात तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






