राज्यात पावसाची धुवाधार बॅटिंग; नद्यांना पूर, शेतीचे मोठे नुकसान, नाशिकला रेड अलर्ट
मुंबई/नाशिक : राज्यभर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासन सतर्क झाले आहे.
वर्धा, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे घराची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
धुळे जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. वाशीम जिल्ह्यात झाडे उन्मळून पडल्याने काही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
नंदुरबारमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी नाशिक जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन गंगापूर धरणातून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429








