सोलापूरजवळ भीषण अपघात; लोखंडी सळ्यांच्या ट्रकला एसटी बसची धडक, चालकासह दोघांचा मृत्यू, १० प्रवासी जखमी
सोलापूर : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेळगी परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला एसटी बसची जोरदार धडक बसल्याने बसचालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये एसटी बसचे चालक दादाराव बनसोडे आणि प्रवासी नागुबाई रेवगे यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून उमरग्याकडे जाणारी एसटी बस शेळगी परिसरातून जात असताना लोखंडी सळ्या भरलेल्या ट्रकाशी तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना त्वरित सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548129








