पारधमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; प्रबोधनात्मक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
पारध (प्रतिनिधी /महेंद्र बेराड): दिनांक 01 ऑगस्ट 2026:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, पारध शाहूराजे यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मातंग समाज सभागृहात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत समाजप्रबोधनपर व्याख्यानांचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात बालवक्ते विद्या दांडगे, वंश दांडगे व मयुरी दांडगे यांनी मनोगते व्यक्त केली. पत्रकार सागर देशमुख, पत्रकार तेजराव दांडगे व ज्येष्ठ पत्रकार रवी लोखंडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य व विचारांचा आढावा घेतला.
प्रा. संग्राम देशमुख यांनी अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनाचा दाखला देत चिरागनगर येथील जागतिक स्मारकाचे महत्त्व विशद केले. सुभाष सुरडकर यांनी पारधमधील सामाजिक सलोखा व एकतेचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे शिक्षक सुभाष साबळे आणि प्रा. अनिल मगर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, भारतीय संविधानाची मूल्ये तसेच अण्णाभाऊंच्या ‘फकिरा’ या गाजलेल्या कादंबरीतील विचारांवर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक समाधान लोखंडे यांनी सर्व वक्त्यांचे कौतुक करत अण्णाभाऊ साठे यांचे समता, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचे विचार प्रत्येकाने जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुराव काकफळे यांनी केले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर लोखंडे, उदयसिंह लोखंडे, प्रा. राजाराम डोईफोडे, बंकिमचंद्र लोखंडे, विवेक अवसरमोल, पांडुरंग लोखंडे, संदीप लोखंडे, संपत काटोले, दिनेश सुरडकर, सायब अली शाह, बाबुराव हिंगे, सिद्धार्थ सुरडकर, शैलेंद्र सुरडकर, राजाराम सुरडकर, पत्रकार रामसिंग ठाकूर, कैलास दांडगे, शकील अहमद, समाधान तेलंग्रे, महेंद्र बेराड, कृष्णा लोखंडे यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
सायंकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मार्गांवरून बँजोच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत युवक, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने परिसर अण्णाभाऊंच्या जयघोषाने दुमदुमून गेला.








