वाकड-डांगे चौकातील बिर्याणी हाऊसमध्ये भीषण आग; १९ वर्षीय कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, दोघे जखमी
पुणे : वाकड-डांगे चौक रस्त्यावरील एका बिर्याणी हाऊसमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस सिलेंडर बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमधील गॅस संपल्यानंतर नवीन गॅस सिलेंडर जोडण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी शेजारीच असलेली मुख्य भट्टी सुरू असल्याने गळती झालेल्या गॅसने अचानक पेट घेतला आणि आगीचा भडका उडाला.
या भीषण दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून तसेच गंभीर भाजल्याने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे वाकड-डांगे चौक परिसरात काही काळ भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, आगीचे नेमके कारण आणि दुर्घटनेबाबत अधिक तपशील मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी








