पुण्यातील सदाशिव पेठेत भरधाव पोलीस व्हॅनचा अपघात; उभ्या असलेल्या ७ वाहनांचे नुकसान
पुणे : शहरातील गजबजलेल्या सदाशिव पेठ परिसरात भरधाव पोलीस व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तब्बल सात वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतून जात असताना पोलीस व्हॅन अचानक अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना एकामागून एक धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांची मोठी गर्दी झाली.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस व्हॅनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता की चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या प्रकरणात आवश्यक ती चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. गर्दीच्या परिसरात झालेल्या या अपघातामुळे वाहनचालक आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत असून, अपघाताचे नेमके कारण समोर आणून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429








