E20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा आरोप; नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराबाहेर युवक काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा
नागपूर : इथेनॉलमिश्रित ‘E20’ पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेर मंगळवारी ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मोर्चेकऱ्यांना गडकरी यांच्या निवासस्थानाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी चिटणीस पार्क चौकात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. तसेच बॅरिकेट्स उभारून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. आंदोलकांनी बॅरिकेट्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की व झटापट झाली.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत E20 पेट्रोल धोरणाचा निषेध केला. इथेनॉलमिश्रित इंधनामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, या आरोपांवर केंद्रीय सरकार किंवा संबंधित यंत्रणेकडून तत्काळ कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
घटनेनंतर चिटणीस पार्क परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429





