पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी तन्मय वंगे बेपत्ता; कुटुंबीयांचा रॅगिंगचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरू
पुणे :पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचा विद्यार्थी तन्मय वंगे हा १८ जुलैपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, तन्मयच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर हॉस्टेलमध्ये रॅगिंग व मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे.
तन्मयचे वडील अजयकुमार वंगे यांनी सांगितले की, रॅगिंगमुळे तन्मय मानसिक तणावाखाली होता. १८ जुलैपासून तो हॉस्टेलमधून बेपत्ता असून, त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.
या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून तपास सुरू केला आहे. तसेच, रॅगिंगच्या आरोपांचीही चौकशी करण्यात येत आहे.
या घटनेमुळे महाविद्यालये आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, रॅगिंगमुळेच तन्मय बेपत्ता झाला का, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






