वालसावंगीतील पोलीस पाटील पद दहा महिन्यांपासून रिक्त; तातडीने भरतीची मागणी
वालसावंगी (प्रतिनिधी / महेंद्र बेराड): भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील पोलीस पाटील पद गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त असल्याने गावातील कायदा व सुव्यवस्था, तंटे-वादांचे निवारण आणि पोलीस प्रशासनाशी समन्वयावर परिणाम होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे हे पद तातडीने भरून गावाला कायमस्वरूपी पोलीस पाटील द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
राज्य शासनाने यापूर्वी अनेक गावांमध्ये गुणवत्तेनुसार पोलीस पाटील पदांची भरती करून रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावला होता. मात्र तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वालसावंगी ग्रामपंचायतीत अद्यापही हे पद रिक्त आहे. वालसावंगी व सुंदरवाडी या संयुक्त ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे २० हजार असून, अशा मोठ्या गावात पोलीस पाटील नसल्याने अनेक प्रशासकीय कामांवर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पोलीस पाटील हा गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारा महत्त्वाचा शासकीय प्रतिनिधी असतो. गावातील गुन्हेगारी, तंटे, सामाजिक प्रश्न, आपत्तीजन्य परिस्थिती तसेच इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते. त्यामुळे हे पद दीर्घकाळ रिक्त राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, यापूर्वी महिला आरक्षणानुसार भरती प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र काही उमेदवार अपात्र ठरल्याने प्रक्रिया रखडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाने नव्याने आवश्यक प्रक्रिया राबवून किंवा लेखी परीक्षा घेऊन हे पद तातडीने भरावे, अशी मागणी होत आहे.
हरिदास गवळी, युवा नेते यांनी सांगितले की, “वालसावंगीसारख्या मोठ्या गावात पोलीस पाटील पद रिक्त असल्याने गावातील अनेक प्रशासकीय व सामाजिक प्रश्न प्रलंबित राहत आहेत. जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून भरती प्रक्रिया पूर्ण करावी.”
पारध येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनीही या मागणीला पाठिंबा देत म्हटले की, “वालसावंगीसारख्या मोठ्या गावात पोलीस पाटील पद दहा महिन्यांपासून रिक्त असणे ही गंभीर बाब आहे. पोलीस पाटील हा गावातील कायदा व सुव्यवस्था, तंटे निवारण आणि प्रशासनाशी समन्वय साधणारा महत्त्वाचा दुवा आहे. जिल्हाधिकारी व संबंधित महसूल प्रशासनाने तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करून गावातील नागरिकांना दिलासा द्यावा. रिक्त पदामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.”




