पद्मावतीजवळ धोकादायक विहिरीने घेतला दोन महिलांचा बळी!
दुचाकीस्वाराला वाचविताना क्रेटा थेट विहिरीत; दोन जण गंभीर जखमी — अडीच तास मदत न पोहोचल्याचा आरोप
धोकादायक विहिरीबाबत प्रशासनाला पूर्वसूचना असूनही उपाययोजना नाहीत; नागरिकांमध्ये संताप
पारध, प्रतिनिधी/महेंद्र बेराड:- भोकरदन तालुक्यातील पारध–वालसावंगी मार्गावर पद्मावती गावाजवळ शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरीत क्रेटा कार कोसळून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, रस्त्यालगत असलेल्या या जीवघेण्या विहिरीबाबत यापूर्वीही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, विहिरीला संरक्षक कठडे अथवा अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यात न आल्याने या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अवघडराव सावंगी येथील नातेवाईकांचा अंत्यविधी आटोपून कुटुंबीय क्रेटा कारने धावडाकडे जात होते. पारध–पद्मावती मार्गावर एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगत असलेल्या सुमारे ९० फूट खोल विहिरीत थेट कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच पारध पोलिस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीचा अंधार, विहिरीतील पाणी आणि बचावासाठी आवश्यक यंत्रणा वेळेत उपलब्ध न झाल्याने मदतकार्यात मोठा विलंब झाला, अशी माहिती समोर आली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मदतकार्य सुरू होण्यास अडीच तासांपर्यंत विलंब झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेत सुलताना बेगम वय 47 वर्ष आणि अकतरबी वय 75 वर्ष यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अन्य दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पूर्वसूचना असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष?
भोकरदन–पारध-वालसावंगी या प्रमुख मार्गांवर रस्त्यालगत असलेल्या उघड्या आणि धोकादायक विहिरींचा प्रश्न यापूर्वीही उपस्थित करण्यात आला होता. या विहिरींना संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालकांच्या जीविताला धोका असल्याचे वारंवार निदर्शनास आणून देण्यात आले होते. अनेक वृत्तपत्रांमधून या अशा धोकादायक विहिरींबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तरीही संबंधित प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर या विहिरीने दोन निष्पाप महिलांचा बळी घेतल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
‘धोकादायक विहिरींना कठडे कधी?’
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, रस्त्यालगतच्या सर्व धोकादायक विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांना संरक्षक कठडे, बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे. तसेच अपघातप्रवण ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
‘धोका स्पष्ट दिसत असतानाही प्रशासनाने उपाययोजना का केल्या नाहीत?’ असा सवाल नागरिक उपस्थित करत असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागांनी केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्षात सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज आहे.
दोन महिलांचा मृत्यू ही केवळ अपघाताची घटना नाही; तर पूर्वसूचना असूनही धोकादायक विहिरींकडे झालेले दुर्लक्ष किती जीवघेणे ठरू शकते, याचा हा गंभीर इशारा आहे.





