दारूसाठी पैसे न दिल्याने आईची लोखंडी रॉडने हत्या; मुलाचा संतापजनक प्रकार
भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील म्हाळवडी येथे दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या आईची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
समीर मालुसरे (वय ३१) याने दारूसाठी आई बेबी मालुसरे (वय ५२) यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या समीरने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात बेबी मालुसरे यांचा मृत्यू झाला.
हत्यानंतर आरोपीने मृतदेह घरातच ठेवला आणि घराला कुलूप लावून आई गावाला गेल्याचा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी भोर पोलिसांनी समीर मालुसरे याला ताब्यात घेतले असून, घटनेचा पुढील तपास भोर पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429




