वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी खासगी प्रॅक्टिसमध्ये?
आठ गावांची आरोग्यसेवा असलेल्या केंद्राबाबत चौकशीची मागणी; आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्याची गरज
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात तब्बल आठ गावे येत असून, या गावांतील नागरिकांच्या आरोग्यसेवेची मोठी जबाबदारी या केंद्रावर आहे. मात्र, केंद्रातील काही कर्मचारी बाहेर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याची चर्चा असून, याबाबत आरोग्य विभागाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वालसावंगी, सुंदरवाडी, पद्मावती, पारध बु., पारध खुर्द, सावंगी अवघडराव, मोहळाई आणि कोसगाव या आठ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या परिसरातील मोठ्या लोकसंख्येला प्राथमिक आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी केंद्रावर आहे.
दरम्यान, परिसरात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची संख्या मोठी असल्याचेही समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार वालसावंगी येथे १२, पारध बु. येथे ३, सावंगी अवघडराव येथे २ तर कोसगाव येथे १ डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि खासगी प्रॅक्टिसचा नेमका संबंध काय, याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शासकीय आरोग्य केंद्रातील कर्मचारी नियोजित वेळेत रुग्णसेवेसाठी उपलब्ध राहणे अपेक्षित असताना, कोणी कर्मचारी बाहेर खासगी प्रॅक्टिस करीत असल्यास त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, त्यांची उपस्थिती आणि खासगी प्रॅक्टिसबाबत वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
आठ गावांची आरोग्यसेवा सांभाळणाऱ्या या प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्यवस्था पारदर्शक आणि सक्षम राहण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी महेंद्र बेराड




