महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम ३६ महिन्यांनंतरही अपूर्ण; आयुक्तांवर कारवाईची मागणी – सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम निर्धारित कालावधी पूर्ण होऊनही अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने संबंधित ठेकेदार तसेच महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे जिल्हाधिकारी तसेच पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेला ३६ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, त्यानंतरही इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे बांधकामाच्या विलंबाची कारणे, कामाचा दर्जा, करारातील अटी आणि महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या देखरेखीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पात विलंब होत असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदारावर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सचिन काळभोर, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, पिंपरी चिंचवड शहर यांनी केली आहे.
या तक्रारीची शासन स्तरावर दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विजय अडसूळ प्रतिनिधी




