नाशिक कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्क ऑर्डरचे रॅकेट; कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांची कंत्राटे मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट वर्क ऑर्डरच्या माध्यमातून ठेकेदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाचा आणि डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून शासनाच्या अधिकृत कागदपत्रांसारख्या दिसणाऱ्या बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आल्या. या आदेशांच्या आधारे ठेकेदारांकडून रोख रक्कम तसेच धनादेश घेतल्याचा आरोप आहे.
क्यूआर कोड नसल्याने बनावट कागदपत्रांचा संशय
काही ठेकेदारांना देण्यात आलेल्या वर्क ऑर्डरवर शासनाच्या अधिकृत आदेशांप्रमाणे क्यूआर कोड नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित ठेकेदारांनी प्रशासनाकडे चौकशी केली असता हे आदेश बनावट असल्याचा प्रकार उघडकीस आला.
काही कंत्राटदारांना पोलिसांना जेवण पुरविणे, पाणीपुरवठा, बॅरिकेड्स, हाऊसकीपिंग आणि विविध साहित्य पुरविणे अशा स्वरूपाच्या मोठ्या रकमेच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्याचे वृत्त आहे. काही आदेशांची किंमत १०० ते १५० कोटी रुपयांपर्यंत असल्याचेही वृत्तांत नमूद करण्यात आले आहे.
जामनेर कनेक्शन समोर
मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील दोन, जळगावमधील एक आणि धुळ्याशी संबंधित एका व्यक्तीचा या कथित प्रकरणाशी संबंध असल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे. मात्र या व्यक्तींची भूमिका आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
फसवणुकीचा आकडा ५०० ते ६०० कोटींचा?
या कथित रॅकेटमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. काही वृत्तांमध्ये हा आकडा तब्बल ₹५०० ते ₹६०० कोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा आकडा अद्याप तपासातून अधिकृतपणे निश्चित झालेला नाही. नेमकी किती रक्कम उकळण्यात आली आणि या प्रकरणात किती जणांचा सहभाग आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या फसवणुकीला बळी पडलेल्या ठेकेदारांनी घाबरून न जाता पोलिसांकडे तक्रार करावी, तसेच बनावट वर्क ऑर्डर, पावत्या, धनादेश आणि इतर संबंधित कागदपत्रे तपास यंत्रणेकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाचा गैरवापर करून आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे आणि या कथित रॅकेटचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास आता पोलिस आणि प्रशासनाकडून केला जाणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429




