ड्रॅगन फ्रूटची ३०० झाडे कुऱ्हाडीने तोडली


ड्रॅगन फ्रूटची ३०० झाडे कुऱ्हाडीने तोडली

सावंगी अवघडराव येथील शेतकऱ्याचे अंदाजे ४ लाखांचे नुकसान; अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार

सावंगी प्रतिनिधी : महेंद्र बेराड

भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील शेतकरी गजानन हरिभाऊ भुते यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रूटची सुमारे ३०० झाडे अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने तोडून टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

गजानन भुते यांच्या शेतातील गट क्रमांक २३१ मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली होती. मोठ्या आर्थिक खर्चासह मेहनत घेऊन उभे केलेले पीक चांगले उत्पादन देण्याच्या तयारीत असतानाच अज्ञात व्यक्तीने झाडांची तोड केली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आगामी उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे.

वर्षभराची मेहनत वाया

ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी रोपे, खांब, लागवड, खते, औषधे तसेच नियमित देखभालीवर मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत उभी राहिलेली सुमारे ३०० झाडे तोडण्यात आल्याने शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. पुन्हा लागवड करून बाग उभी करण्यासाठी अतिरिक्त खर्च आणि वेळ लागणार असल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी

या प्रकरणी शेतकरी गजानन हरिभाऊ भुते यांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शेतातील ड्रॅगन फ्रूटची झाडे तोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच संबंधित प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त पिकाचे मूल्यांकन करावे, अशी मागणीही शेतकऱ्याने केली आहे.

नुकसानभरपाई देण्याची मागणी

मोठा खर्च करून उभे केलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानीचे योग्य मूल्यांकन करावे आणि नियमानुसार शेतकऱ्याला आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी गजानन भुते यांनी केली आहे.

फोटो कॅप्शन : सावंगी अवघडराव येथील शेतात अज्ञात व्यक्तीने तोडलेली ड्रॅगन फ्रूटची झाडे.


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!