चाकण एमआयडीसीत खड्डे अन् वाहतूक कोंडीचा त्रास; २० लघुउद्योग खंडाळ्यात जाण्याच्या तयारीत, ४ हजार नोकऱ्यांवर संकट
चाकण:चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची चाळण, दैनंदिन होणारी गंभीर वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथील उद्योग जगतात तीव्र असंतोष पसरला आहे. या समस्यांना कंटाळून चाकण एमआयडीसीतील सुमारे २० लघुउद्योग खंडाळा (जि. सातारा) एमआयडीसीमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
या संभाव्य स्थलांतरामुळे सुमारे ४ हजार कामगारांच्या नोकऱ्यांवर संक्रांत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, हे उद्योग इतरत्र हलवल्यास सुमारे १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक चाकणमधून बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्योग विश्वात चिंतेचे वातावरण
चाकण एमआयडीसी हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र मानले जाते. मात्र, गेल्या काही काळापासून येथील रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, त्यामुळे लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि मूलभूत सुविधांचा अभाव यांमुळे कच्चा माल वेळेत पोहोचवणे आणि तयार माल बाहेर पाठवणे उद्योगपतींसाठी मोठे आव्हान ठरत आहे. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने उद्योजकांनी अखेर खंडाळा एमआयडीसीचा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित प्रशासनाने या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास चाकणमधील रोजगाराचे चित्र अधिक बिकट होण्याची चिन्हे आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429




