बोरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्या अदनानची सुखरूप सुटका
परभणी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे शेतात खेळत असताना तीन वर्षांचा अदनान उघड्या बोरवेलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली. घटना समोर येताच ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले.
बोरवेलमध्ये अडकलेल्या अदनानला श्वास घेण्यास त्रास होऊ नये यासाठी तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने बोरवेललगत खोदकाम करून चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तातडीने एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्याचे निर्देश दिले. मात्र, स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे अवघ्या तासाभरातच बचावकार्याला यश आले.
अथक प्रयत्नांनंतर तीन वर्षांच्या अदनानला सुखरूप बाहेर काढण्यात आले. चिमुकल्याची सुरक्षित सुटका झाल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429








