पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस आणि RPF ची मध्यरात्री धडक कारवाई; संयुक्त ‘कोंबिंग ऑपरेशन’ने गुन्हेगारांचे धाबे दणाणले
पुणे:
पुणे रेल्वे स्टेशन आणि आसपासच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री पोलीस आणि RPF कडून संयुक्त ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाणे, बंडगार्डन व कोरेगाव पार्क वाहतूक विभाग, पुणे लोहमार्ग पोलीस आणि RPF यांच्या पथकांनी ही धडक कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान अलंकार चौक आणि जहांगीर चौक येथे कडक नाकाबंदी लावून १४६ वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या २९ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करत २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच स्टेशन परिसरातील २१ अनधिकृत हातगाड्या, स्टॉल व फेरीवाल्यांवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.
हॉटेल व लॉजची कडक तपासणी
सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील १३ हॉटेल आणि लॉजची पाहणी करण्यात आली. लॉज चालकांना येणाऱ्या प्रवाशांची ओळखपत्रे व पुणे भेटीचे कारण तपासूनच रूम देण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ बंडगार्डन पोलीस ठाणे किंवा ‘डायल ११२’ वर संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले.
७२ संशयितांची झाडाझडती
मोहिमेत ७२ संशयित आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी निष्पन्न झालेल्या १५ जणांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वे परिसरात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३७ जणांकडून १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर ३० जणांवर ‘बीपी ऍक्ट’नुसार कारवाई करण्यात आली.
डॉक्टर राजकुमार शिंदे भा पो से पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण संयुक्त मोहीम पार पडली. शहर पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि RPF यांच्या या समन्वयित कारवाईमुळे स्टेशन परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा चाप बसला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429





