पिंपरी-चिंचवड भाजपमधील अंतर्गत कारभारावर सचिन काळभोर यांची नाराजी; प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या पक्षांतर्गत कारभाराबाबत पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे गंभीर तक्रार केली आहे. पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांना डावलून विकासकामांमध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून, महापौर रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी विविध कामे सुरू असल्याचे काळभोर यांनी नमूद केले आहे. मात्र, पक्षातील काही स्थानिक नेत्यांकडून महापौरांना अपेक्षित पद्धतीने काम करू दिले जात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गेल्या वर्षभरात तब्बल तिसऱ्यांदा पक्षातीलच नेत्यांकडून सभा तहकूब करण्यात आल्याने महापौरांच्या कामकाजावर परिणाम होत असून, त्यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारासाठी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे जबाबदार असल्याचा आरोपही काळभोर यांनी केला असून, त्यांनी हे आरोप संबंधित वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिले आहेत.
स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणि मनमानी कारभारामुळे पक्षाची प्रतिमा जनमानसात खराब होण्याची शक्यता असून, यामुळे पक्षाच्या विकासाच्या अजेंड्यावरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता काळभोर यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष घालून वस्तुस्थितीची चौकशी करावी तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन महापौरांना विनाअडथळा काम करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
प्रतिनिधी : विजय अडसूळ
मो. 9623113336





