जामा मशिद पारधच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
रक्तदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पारध, प्रतिनिधी महेंद्र बेराड: पारध बु. येथे ईद मिलाद-उन-नबी निमित्त जामा मशिद पारधच्या वतीने मुस्लिम शादीखाना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमाला परिसरातील नागरिक व तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, माजी सभापती परमेश्वर लोखंडे, शरदचंद्र देशमुख, उदयसिंग लोखंडे, प्रा. संग्राम देशमुख, रवि सर लोखंडे, काझी सादिक, हाफिज खलील, संदीप क्षीरसागर, समाधान तेलंग्रे, सागर देशमुख, अजहर पठाण सर अन्वर पठाण, शेख अजीज, डॉ. वाजिद खान, शेख आबेद, शेख नासेर, शेख लतीफ, शेख नसीर, शेख साबीर, हाफिज शाहबुद्दीन, समी खान व बाबू खान, रहिम भाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांच्या रक्त संकलन पथकाने सहकार्य केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, असा सामाजिक संदेश यावेळी देण्यात आला.
जामा मशिद, मुस्लिम पंच कमिटी व मुस्लिम युवा पारध यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे.




