गोल्डन वॉरियर्स पुणे संघाचे मास्टर हॉकी कपमध्ये ऐतिहासिक विजेतेपद


गोल्डन वॉरियर्स पुणे संघाचे मास्टर हॉकी कपमध्ये ऐतिहासिक विजेतेपद

पुणे : दिल्ली येथे २ ते ५ सप्टेंबर २०२६ दरम्यान झालेल्या मास्टर हॉकी कप २०२६ स्पर्धेत ‘गोल्डन वॉरियर्स पुणे’ संघाने दमदार कामगिरी करत ऐतिहासिक अजिंक्यपद पटकावले. उपांत्य फेरीत भोपाळच्या मध्य प्रदेश संघाचा ४-२ असा पराभव केल्यानंतर अंतिम सामन्यात पंजाब संघावर टायब्रेकरमध्ये मात करत पुणे संघाने विजेतेपदावर नाव कोरले.
उपांत्य फेरीच्या सामन्यात गोल्डन वॉरियर्स पुणे संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मध्य प्रदेश (भोपाळ) संघावर ४-२ अशी मात केली. पुण्याकडून प्रकाश सपकाळ यांनी दोन गोल, तर दत्ता शिंदे आणि सुलेमान शेख यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
अंतिम सामन्यात पुणे आणि पंजाब संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केल्याने सामना १-१ असा बरोबरीत सुटला. पुण्याकडून शैलेश गरसुंद यांनी महत्त्वपूर्ण गोल नोंदवला.
विजेत्याचा निर्णय घेण्यासाठी टायब्रेकर घेण्यात आला. या निर्णायक क्षणी पुणे संघाच्या खेळाडूंनी संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवत अचूक गोल नोंदवले. प्रकाश सपकाळ, योगेश येसुर, राजेश मुसळे, दत्ता शिंदे आणि आनंद काजुळकर यांनी टायब्रेकरमध्ये गोल करत गोल्डन वॉरियर्स पुणेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संपूर्ण स्पर्धेत रमेश पिल्ले, कमलाकर गायकवाड, सिरीयल जोसेफ आणि सचिन सावंत यांनीही चमकदार कामगिरी करत संघाच्या ऐतिहासिक विजेतेपदात मोलाचे योगदान दिले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तीन वेळा ऑलिंपिक पदक विजेते दिग्गज हॉकीपटू हरबिंदर सिंग यांच्या हस्ते पार पडला. गोल्डन वॉरियर्स पुणे संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे क्रीडाप्रेमी आणि विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!