जळगाव शहरातील गणेशोत्सव महामंडळाचे नामकरण; मुकुंद मेटकर अध्यक्ष तर दीपक जोशी कार्याध्यक्ष पदी; बैठकीत डीजेमुक्तीचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर!..
सोमेश मुळे जळगाव: शहरातील गणेशोत्सव मंडळांची मध्यवर्ती संस्था असलेल्या गणेशोत्सव महामंडळात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या महामंडळाचे आता अधिकृतपणे ‘डॉ. अविनाश दादा आचार्य प्रणीत गणेशोत्सव महामंडळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या बदलांसोबतच महामंडळाच्या नवनवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा देखील करण्यात आली असून, अध्यक्षपदी मुकुंद मेटकर तर कार्याध्यक्षपदी दीपक जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या पद्मावती मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता गणेशोत्सव महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
उत्सवाला पर्यावरणपूरक आणि शांतताप्रिय बनवण्यासाठी ‘डीजेमुक्तीचा’ ठराव
या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जळगाव शहरात गणेशोत्सव पारंपरिक आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी ‘डीजेमुक्तीचा’ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. उत्सवा दरम्यान होणारा आवाजाचा प्रदूषण टाळण्यासाठी आणि पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळाने हे अत्यंत पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे जळगावच्या गणेशोत्सवाला एक नवा आणि आदर्श पायंडा पडणार आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
महामंडळाच्या या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जळगाव शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी असणारे मुकुंद मेटकर यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर, उत्सव अधिक नेटका आणि नियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी कार्याध्यक्ष म्हणून दीपक जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
पारंपरिक पद्धतीने उत्सव अधिक भव्य करणार: नूतन पदाधिकारी
या निवडीनंतर आणि ठरावानंतर बोलताना नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “डॉ. अविनाश दादा आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विचारांनी प्रेरित होऊन जळगाव शहरातील गणेशोत्सव अधिक सार्वजनिक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. डीजेमुक्तीच्या निर्णयामुळे यंदाचा उत्सव अधिक पारंपारिक आणि घरगुती वातावरणात साजरा होईल. शहरातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळांना सोबत घेऊन या महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला जाईल.”
महामंडळाच्या या नवीन नावामुळे, पर्यावरणपूरक निर्णयामुळे आणि नव्या ऊर्जेने भरलेल्या कार्यकारिणीमुळे जळगावच्या आगामी गणेशोत्सवात नवा उत्साह पाहायला मिळणार, यात शंका नाही. शहरातील विविध गणेश मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







