सरकारी बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप स्थगित; ग्राहकांना मोठा दिलासा


सरकारी बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप स्थगित; ग्राहकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेला तीन दिवसीय देशव्यापी संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात रविवारी रात्री झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सलग तीन दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता टळली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याबाबत चर्चा करण्यासाठी IBA आणि UFBUची उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन करण्यात येणार आहे. सध्या प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. उर्वरित शनिवार सुट्टीचे दिवस करण्याच्या मागणीवर समिती विविध पर्यायांचा अभ्यास करणार आहे.
याशिवाय स्केल-४ आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठीच्या परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. पेन्शनशी संबंधित लाभ, महागाई भत्त्याचा समान फॉर्म्युला तसेच NPS कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय यांसारख्या प्रलंबित मागण्यांवरही पुढील चर्चा सुरू राहणार आहे.
२८ ते ३० सप्टेंबरदरम्यान संप झाल्यास महिनाअखेरीस बँकिंग व्यवहार, धनादेश क्लिअरिंग आणि शाखांमधील प्रत्यक्ष सेवांवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र संप स्थगित झाल्यामुळे बँक ग्राहकांचे नियमित व्यवहार सुरळीत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!