जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हल्लाबोल आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन; वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
जालना, दि. २८ सप्टेंबर प्रतिनिधी/ महेंद्र बेराड: शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज, सोमवार (दि. २८ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत असून, संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आप्पासाहेब कदम तसेच मराठवाडा कार्याध्यक्ष सुरेश गवळी यांची आंदोलनस्थळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावी, २०२४ व २०२५ सालातील प्रलंबित पीकविमा तातडीने द्यावा, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, कर्जमाफीच्या कक्षेत पात्र शेतकऱ्यांना आणावे, पुनर्गठित व रूपांतरित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावी, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.
याशिवाय शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज तात्काळ उपलब्ध करून देणे, पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करणे, अवास्तव व्याज आकारणाऱ्या बँकांचे ऑडिट करणे, जुनी चार-ट्रिगर पीकविमा योजना लागू करणे, चालू वर्षाचा पीकविमा मंजूर करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, गावागावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून देणे तसेच शेतमजूर व भूमिहीनांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करणे, या मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष विष्णु शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे भोकरदन तालुकाध्यक्ष महेंद्र बेराड यांनीही भोकरदन तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने जालना येथे उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्वांनी एकजुटीने हल्लाबोल आंदोलनात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.





