विथ्या रामराजचा ऐतिहासिक विक्रम; पी. टी. उषांचा ४२ वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडला
नागोया : भारतीय धावपटू विथ्या रामराजने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत महिलांच्या ४०० मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरीत तिने ५४.७५ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत पी. टी. उषांचा ४२ वर्षांपासून कायम असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला.
पी. टी. उषांनी १९८४च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवत हा विक्रम प्रस्थापित केला होता. विथ्याने आता ०.६७ सेकंदांची सुधारणा करत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे २०२३च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत विथ्याने ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवत उषांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
४०० मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत यूएईच्या मरियम करीमने ५४.३१ सेकंदांसह सुवर्णपदक, तर कझाकिस्तानच्या अॅडेलिना झेम्सने ५४.५८ सेकंदांसह रौप्यपदक पटकावले. विथ्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
विथ्याचे या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी तिने मिश्र ४×४०० मीटर रिलेमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिच्या विक्रमी कामगिरीनंतर पी. टी. उषांनीही विथ्याचे अभिनंदन केले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





