कौशल्य विकासातून जागतिक रोजगाराच्या संधी; महाराष्ट्रातील युवकांना सक्षम करण्याचा संकल्प


कौशल्य विकासातून जागतिक रोजगाराच्या संधी; महाराष्ट्रातील युवकांना सक्षम करण्याचा संकल्प

मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना देश-विदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी मोठी आणि सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ‘सेवा, संकल्प, अभियान’ सुरू करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
देशातील नागरिकांचे सरासरी वय २७ ते २८ वर्षे असून, सुमारे ६५ टक्के लोकसंख्या रोजगारक्षम आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कौशल्य विकास विभागाने १,५०० हून अधिक रोजगार मेळावे आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी ४०० हून अधिक रोजगार मेळावे एकाच दिवशी आयोजित करण्यात आले आहेत. या रोजगार मेळाव्यांसाठी सुमारे एक लाख युवकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी सुमारे ५० हजार युवकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
उर्वरित युवकांसाठीही सातत्याने रोजगार मेळावे आयोजित करून टप्प्याटप्प्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जगभरात कुशल मनुष्यबळाची कमतरता असून, विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मानवसंसाधनाची आवश्यकता आहे. ही गरज पूर्ण करण्याची क्षमता भारताकडे आहे. या पार्श्वभूमीवर भारताने २८ देशांसोबत करार केले असून, महाराष्ट्रातील युवकांना जगभरातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग आवश्यक सहकार्य करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होत असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे युवकांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याबरोबरच आपल्या कौशल्यांचे सातत्याने अद्ययावतीकरण करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, मंत्री आदिती तटकरे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!