नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य आणि ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिक भवन, सेक्टर १२, नेरूळ येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची माहिती ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळचे प्रसिद्धी प्रमुख भालचंद्र माने यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे रोटरियन डॉक्टर राधाकृष्णन भट्ट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र सरकार, समाज कल्याण, मुंबई विभागाचे जनसंपर्क अधिकारी श्री. संजय भोसले यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी त्यांनी शासनाच्या ज्येष्ठ नागरिक महामंडळासंदर्भातील निर्णयाची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात सन्मानपूर्वक व सुरक्षित जीवन जगता यावे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे, आर्थिक व वैद्यकीय मदत मिळावी, तसेच छळ-पिळवणूक, जीवित व मालमत्तेचे संरक्षण, निवारा आणि अपघात विमा यांसारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे राहणार असून शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा निर्णय वर्षा देशमुख, उपसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब टेकाळे यांनी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या सुख-सुविधांसाठी महामंडळाला मंजुरी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. रेल्वे प्रवासातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा व तिकिटातील सवलतीसाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक संस्था, नेरूळचे अध्यक्ष श्री. दिगंबर चापके साहेब यांनी महामंडळाच्या स्थापनेसाठी डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. नवी मुंबईतील विरंगुळा केंद्रे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष संघटित प्रयत्नांमुळे नवी मुंबई महानगरपालिकेत निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई-नवी मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल उपस्थितांचे आभार मानले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.
ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री. अरविंद वाळवेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा देत डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांच्या ज्येष्ठांसाठीच्या कार्याचे अभिनंदन केले.
अध्यक्ष श्री. विकास साठे यांनी १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट केली. संयुक्त राष्ट्रसंघाने १९९० मध्ये यासंदर्भात ठराव केला असून १९९१ पासून हा दिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या कौटुंबिक रचनेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर संघ काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. कुटुंब, समाज आणि देशासाठी ज्येष्ठांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिनाचे महत्त्व असल्याचे सांगत, ज्येष्ठ नागरिक चळवळीत योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा प्रतिनिधिक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सांस्कृतिक भागात ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्री. ब्रिजेश श्रीवास्तव यांच्या माध्यमातून “स्वरम करोके ऑर्केस्ट्रा शो” सादर करण्यात आला. हौशी नृत्य करणाऱ्या सदस्यांसह उपस्थितांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री. अजय माढेकर यांनी केले. गुरुनाथ सरमळकर यांनी छायाचित्रण केले. रजनी कलोसे, स्वाती गावडे आणि निर्मला शिंदे यांनी मान्यवरांचे आदरातिथ्य केले. रंगा राव आणि दत्ताराम आम्ब्रे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था पाहिली. उपाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





