सावधान! बँक खाते बंद होण्याच्या बनावट मेसेजद्वारे सायबर भामट्यांचा गंडा; बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट नोटीस व्हायरल
पिंपरी-चिंचवड: बँक ऑफ इंडियाच्या (Bank of India) ग्राहकांना लक्ष्य करत सायबर भामट्यांनी फसवणुकीचा नवीन फंडा शोधून काढला आहे. “तुमचे बँक खाते आजच बंद केले जाईल” अशी भीती दाखवून नागरिकांना बनावट ‘APK File’ डाउनलोड करण्यास सांगणारे मेसेज आणि नोटीस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बँक प्रशासनाने व पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे व्हायरल मेसेजमध्ये?
सायबर गुन्हेगारांकडून पाठवल्या जाणाऱ्या या नोटीसवर बँक ऑफ इंडियाचे अधिकृत लोगो आणि बनावट शिक्के वापरण्यात आले आहेत. त्यामध्ये असे नमूद केले आहे की, “आधार आणि पॅन कार्डचे KYC अपडेट न केल्यामुळे तुमचे बँक खाते आजच निलंबित (Suspend) केले जाईल”. खाते पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी लगेचच दिलेल्या APK लिंकवर क्लिक करून KYC अपडेट करा, असा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे.
फसवणुकीची पद्धत आणि त्रुटी:
या बनावट नोटीसमध्ये अनेक त्रुटी असून त्यावरून हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट होते:
बनावट ईमेल आयडी: नोटीसच्या खालील भागात ‘[email protected]’ हा ईमेल आयडी देण्यात आला आहे. कोणत्याही अधिकृत बँकेचा ईमेल आयडी कधीही ‘gmail.com’ वर नसतो.
APK फायलींचा धोका: बँकेचे KYC अपडेट करण्यासाठी कधीही स्वतंत्र ‘APK File’ डाउनलोड करण्यास सांगितले जात नाही. अशा फायली मोबाइलमध्ये इंस्टॉल केल्यास फोनमधील संपूर्ण डेटा आणि बँक खात्याची माहिती सायबर चोरांच्या हाती जाऊ शकते.
इंग्रजी भाषेतील चुका: नोटीसमधील इंग्रजी वाक्यरचनेत अनेक व्याकरणाच्या चुका दिसून येत आहेत.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
१. अशा कोणत्याही मेसेजवर, लिंकवर किंवा अज्ञात APK फाईलवर क्लिक करू नका.
२. कोणतीही बँक फोन, मेसेज किंवा व्हॉट्सॲपवरून KYC अपडेट करण्यासाठी APK फाईल डाउनलोड करण्यास सांगत नाही.
३. अशा प्रकारचा मेसेज आल्यास तात्काळ आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.
४. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइन नंबरवर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
पत्रकार उमेश कुलकर्णी





