संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; ८ जुलैला आळंदीतून प्रस्थान
पुणे: आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ८ जुलै रोजी आळंदी येथून पालखी प्रस्थान करणार आहे. तब्बल ३३ दिवसांच्या या भक्तिमय प्रवासानंतर ८ ऑगस्ट रोजी पालखी पुन्हा आळंदीत परतणार आहे.
आळंदी देवस्थान आणि दिंडी समाज संघटनेच्या १३ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत यंदाच्या पालखी सोहळ्याचे नियोजन निश्चित करण्यात आले. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यात यंदा ३ उभी रिंगणे आणि ४ गोल रिंगणे आयोजित करण्यात येणार आहेत.
वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे पुणे आणि सासवड येथे पालखीचा प्रत्येकी दोन दिवस मुक्काम असणार आहे. पारंपरिक धार्मिक विधी, दिंडींचा सहभाग, रिंगण सोहळे आणि भक्तिमय वातावरणामुळे यंदाची वारी अधिक उत्साहात पार पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरवर्षीप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याकडे राज्यासह देशभरातील भाविकांचे लक्ष लागले असून, प्रशासन, देवस्थान आणि दिंडी संघटनांकडून नियोजनाला वेग देण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
पत्रकार उमेश कुलकर्णी. 9822548429






