मुंबईच्या खारमध्ये धावत्या रिक्षावर झाड कोसळून भीषण दुर्घटना; १४ वर्षीय मुलीचा मृत्यू, एक तरुणी गंभीर
मुंबई: मुंबईतील खार परिसरात एका धावत्या रिक्षावर मोठे झाड कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘ब्लू स्टोन बिल्डर’ या खाजगी इमारतीच्या आवारातील हे झाड थेट रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर पडले.
या दुर्घटनेत रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, प्रवासी अरिका श्रीवास्तव (१४) या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर हर्षिता कुमार (२१) ही तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच, महापालिकेच्या झाड छाटणीच्या धोरणावर आणि खाजगी इमारतींच्या आवारातील झाडांच्या सुरक्षिततेवर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि छाटणी योग्य प्रकारे झाली का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी










