वडापाव विक्रेते तुकाराम मुंढेंच्या रडारवर; वर्तमानपत्रात पॅकिंग केल्यास कडक कारवाई
मुंबई : मुंबईतील अनेक वडापाव आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचे समोर आल्यानंतर अन्न सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकाराची दखल घेत भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) तसेच मुंबई महानगरपालिकेने संबंधित विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, खाद्यपदार्थ बांधण्यासाठी किंवा पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर पूर्णपणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये विविध रासायनिक घटक असतात. हे घटक अन्नपदार्थांच्या संपर्कात आल्यास आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या पॅकिंगला FSSAI ने यापूर्वीच बंदी घातली आहे.
मुंबईतील वडापाव, भजी, समोसे तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा तपासणी मोहिमेदरम्यान दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी ,मो. ९८२२५४८४२९










