भक्ताच्या वेषात मंदिरात प्रवेश; देवीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणारे दोघे अटकेत
नागपूर :नागपूरच्या धंतोली परिसरातील एका प्रसिद्ध भगवती मंदिरात देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोन तरुणांना धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत आरोपींना काही तासांतच गजाआड केले.
इरफान हमीद शेख (वय २४) आणि शोएब जावेद शेख (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भक्ताच्या वेषात मंदिरात आले होते. त्यांनी देवीचे दर्शन घेत असल्याचे भासवत गाभाऱ्यात प्रवेश केला. त्या वेळी परिसरात कोणी नसल्याची संधी साधून देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून तेथून पलायन केले.
चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर मंदिर प्रशासनाने धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजमध्ये आरोपींची हालचाल आणि चोरीची घटना स्पष्टपणे दिसून आल्याने पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.
तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरी केलेल्या दागिन्याबाबत आणि इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
9822548429









