अॅम्ब्युलन्सच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन; नांदेडमधील वैद्यकीय अधिकारी निलंबित
नांदेड: नांदेड जिल्ह्यातील नायगाव ग्रामीण रुग्णालयात अत्यंत धक्कादायक आणि निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध असतानाही नियमांचे उल्लंघन करून एका खाजगी अॅम्ब्युलन्सच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतेचिन कादरी यांना तात्काळ निलंबित केले आहे.
या घटनेची चौकशी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चौकशीत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात गंभीर कसूर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी दोघांविरुद्धही प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयांतील आरोग्य सेवांच्या कार्यपद्धतीवर आणि प्रशासनाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429







