श्रीरामपूरात भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या; शहरात खळबळ.


श्रीरामपूरात भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या; शहरात खळबळ

टाकळीभान प्रतिनिधी – श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड परिसरात शनिवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत हॉटेल लक्ष्मीनारायणचे चालक-मालक आकाश शेखर दुबैय्या (वेंकटरामन) यांची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संशयित सुरज जाधव व त्याच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये येऊन आकाश दुबैय्या यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या दुबैय्या यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासा विशेष पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित सुरज जाधव हा नेवासा रोडवरील बसस्थानकासमोर चिकन टिक्क्याची गाडी चालवत असून त्याचा शहरातील एका सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

घटनेनंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणाचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असून हत्येचे नेमके कारण आणि आरोपींच्या भूमिकेबाबत अधिक माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

प्रतिनिधी:  दिलीप लोखंडे श्रीरामपूर


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!