गोंदियात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; शाळेच्या व्हॅनची वाट पाहणाऱ्या ७ वर्षीय चिमुरडीवर हल्ला
गोंदिया :गोंदिया शहरातील रिंग रोड परिसरात भटक्या कुत्र्यांच्या कळपाने सात वर्षीय चिमुरडीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या व्हॅनची वाट पाहत उभी असताना कुत्र्यांनी अचानक तिच्यावर झडप घातली.
आरडाओरडा ऐकून शेजारील महिला तात्काळ मदतीला धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या हल्ल्यात चिमुरडीच्या हाताला कुत्र्यांनी चावा घेतल्याने ती जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, नगरसेवकांसह स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






