अहिल्यानगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; एका वृद्धाचा मृत्यू, १५ नागरिक जखमी
अहिल्यानगर:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत नागरिकांवर हल्ला केला. या भीषण घटनेत ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून १५ नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तीचे नाव साहेबराव वाघमारे (वय ७०) असे आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात साहेबराव वाघमारे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात आणखी १५ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, चिंचोली फाटा आणि परिसरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. या घटनेनंतर संबंधित विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429





