ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शैक्षणिक व राजकीय वर्तुळात शोककळा
कोल्हापूर:प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील (वय ९०) यांचे कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून त्यांनी देशभरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था उभारल्या. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण व्यवस्थेसाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी D. Y. Patil Group च्या माध्यमातून वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कृषी यांसारख्या विविध शाखांमध्ये शिक्षणाची दालने उघडून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शैक्षणिक कार्यासोबतच त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.
त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेते, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कार्याचा वारसा सदैव प्रेरणादायी राहील, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी (9822548429)





