पारध पोलिसांच्या प्रभावी तपासाला यश; हुंडाबळी व मारहाण प्रकरणातील आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास, ₹50 हजार दंड
पारध (प्रतिनिधी): पोलीस स्टेशन पारध येथे दाखल असलेल्या हुंडाबळी व मारहाण प्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारावास व ₹50 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये प्रभावी तपास व न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोषींना शिक्षा होऊ शकते, हा संदेश समाजात गेला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन पारध येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 34/2022 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 498-अ, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी संजय शिवाजी कोलते (रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर प्रकरणाची सुनावणी मा. न्यायालयात झाली. खटल्यातील पुरावे, साक्षी आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेऊन मा. न्यायालय (मा. काळे साहेब) यांनी आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 323 अंतर्गत दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास तसेच ₹50,000/- दंड अशी शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिनकर यांनी केला. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे मा. सरकारी अभियोक्ता श्री. गवळी साहेब यांनी प्रभावी युक्तिवाद करत दोषारोप सिद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच न्यायालयीन कामकाजात महिला पोलीस हवालदार संगीता मोकाशे यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. तेजबीर सिंग संधू, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. साळी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कटेकर तसेच पोलीस स्टेशन पारधचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या निकालामुळे महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक छळ आणि मारहाणीच्या प्रकरणांमध्ये दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासनाची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली असून, अशा गुन्ह्यांमध्ये प्रभावी तपास आणि सक्षम न्यायालयीन मांडणीमुळे न्याय मिळवून देण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.





