रायगडमध्ये धबधब्यावर रिल्स बनवताना दरीत कोसळून ठाण्याच्या तरुणाचा मृत्यू; खोपोलीजवळील दुर्दैवी घटना
रायगड :सोशल मीडियासाठी रिल्स बनवण्याच्या नादात आणखी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळील केपी धबधब्यावर घडली आहे. रिल्स बनवत असताना पाय घसरून सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळल्याने ठाण्यातील अभिषेक कुशवाह (वय २३) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी अभिषेक आपल्या मित्रांसोबत खोपोली परिसरात पर्यटनासाठी आला होता. धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर परतत असताना केपी धबधब्याजवळ रिल्स बनवताना त्याचा तोल गेला आणि तो थेट खोल दरीत कोसळला.
घटनेची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने तातडीने शोध व बचाव मोहीम सुरू केली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यरात्रीच्या सुमारास अभिषेक यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात धबधबे आणि दऱ्यांजवळ रिल्स किंवा सेल्फी काढताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429





