पुण्याने वाहतूक कोंडीत नोंदवला नवा विक्रम; जगात ५व्या तर देशात दुसऱ्या क्रमांकावर
पुणे :
पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आता जागतिक स्तरावरही चिंतेचा विषय ठरली आहे. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स २०२५ च्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पुणे पाचव्या क्रमांकावर, तर भारतात बंगळुरूनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अहवालानुसार, वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचा वर्षाला सरासरी १५२ तासांचा वेळ रस्त्यावर वाया जात आहे. शहरात १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे लागतात, तर वाहनांचा सरासरी वेग ताशी केवळ १८ किलोमीटर इतका राहिला आहे. त्यामुळे दररोज कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि इतर कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जागतिक क्रमवारीत मेक्सिको सिटी अव्वल स्थानावर असून, भारतातील बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, २०२५ मधील ऑगस्ट महिना पुण्यात सर्वाधिक वाहतूक कोंडीचा ठरल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील वाढती वाहनसंख्या, अपुरी रस्ते क्षमता, मेट्रो आणि विविध विकासकामांमुळे होणारे अडथळे तसेच सार्वजनिक वाहतुकीवरील वाढता ताण ही वाहतूक कोंडीमागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, पर्यायी रस्त्यांचे जाळे विकसित करणे आणि सिग्नल व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





