भाजप पिंपरी-चिंचवड शहरात प्रवक्तेपदावरून संभ्रम; प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार सचिन काळभोर.


07.08.2026
भाजप पिंपरी-चिंचवड शहरात प्रवक्तेपदावरून संभ्रम; प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार सचिन काळभोर.
टिकर : भाजप शहर संघटनेतील प्रवक्तेपद चर्चेत • एकाच पदावर दोन नियुक्त्यांचा दावा • पक्षाची अधिकृत भूमिका कोण मांडणार? • कार्यकर्त्यांच्या संभ्रमाबाबत प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनेत प्रवक्तेपदाच्या नियुक्तीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शहर कार्यकारिणीमध्ये एकाच पदावर दोन व्यक्तींची नियुक्ती झाल्याचा दावा करत काही कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते सचिन सुदाम काळभोर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे.

भाजप पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीमध्ये यापूर्वी कुणाल दशरथ लांडगे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी राजू अनंत दुर्गे यांचीही प्रवक्तेपदी नियुक्ती केल्याने पक्षाच्या संघटनात्मक रचनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

पक्षाच्या भूमिकेचे माध्यमांसमोर प्रभावीपणे सादरीकरण करण्यासाठी प्रवक्त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर देणे, पक्षाची भूमिका स्पष्ट करणे तसेच पत्रकार परिषद, सोशल मीडिया आणि विविध माध्यमांमधून पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी प्रवक्त्यांवर असते. मात्र, एकाच पदावर दोन नियुक्त्या झाल्यामुळे अधिकृत भूमिका नेमकी कोण मांडणार, असा प्रश्न काही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही काळात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांवरून राजकीय वातावरण तापले आहे. मोशी कचरा डेपो, छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा प्रकल्प, सांगवी येथील शितोळे सरकार उड्डाणपूल तसेच महापालिका प्रशासन भवनातील आंदोलन यांसारख्या विषयांवर विरोधकांनी भाजपवर टीका केली होती. या वेळी पक्षाच्या प्रवक्त्यांकडून प्रभावी प्रत्युत्तर देण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती.

तसेच काही सार्वजनिक कार्यक्रमांमधील राजकीय घडामोडींवरूनही शहर भाजपमध्ये चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नव्या प्रवक्त्याच्या नियुक्तीमुळे पक्षातील अंतर्गत समन्वय आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपाबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, दोन प्रवक्त्यांच्या नियुक्तीबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ही नियुक्ती संघटनात्मक विस्ताराचा भाग आहे की प्रवक्त्यांच्या जबाबदाऱ्यांचे स्वतंत्र विभाजन करण्यात आले आहे, हे स्पष्ट होणे बाकी आहे.

कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून लवकरच भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर या विषयाकडे पक्ष नेतृत्व कसे पाहते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!