भिवंडीत अघोरी उपचाराच्या नावाखाली महिलेवर अत्याचार; मौलवीला अटक
भिवंडी : आजार बरा करण्यासाठी अघोरी विधी करण्याच्या नावाखाली ३० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील एका दर्ग्यात समोर आला आहे. या प्रकरणी मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आजार बरा करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेवर कथितरित्या अत्याचार करण्यात आला. यावेळी तिचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात जादूटोणा विरोधी कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भायखळा रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करून मोहम्मद इस्माईल वारीस शेख याला ताब्यात घेतले आणि अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, आरोपीने अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक किंवा अत्याचार केला आहे का, याचाही तपास केला जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429







