निगडीत कचरा संकलन वाहनाच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू..


निगडीत कचरा संकलन वाहनाच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू.

निगडी | प्रतिनिधी.  निगडीतील साईनाथनगर परिसरात कचरा संकलनासाठी आलेल्या डंपरच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) दुपारी घडली. या घटनेनंतर पोलिसांनी वाहन व चालकाला ताब्यात घेतले असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.१० वाजता साईनाथनगर येथील औदुंबर सोसायटीसमोर महिंद्रा सुप्रो कचरा संकलन वाहन (क्र. MH-14-HG-7123) कचरा संकलनासाठी आले होते. त्यावेळी वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक झाली. या धडकेमुळे दुचाकीचा आघात संस्कृती भागवत बिरादार (वय ५, रा. औदुंबर सोसायटी, यमुनानगर, निगडी) हिला लागला. ती वाहनाखाली आल्याने गंभीर जखमी झाली.

संस्कृतीला तातडीने निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

घटनेनंतर पोलिसांनी वाहनाचा चालक राहुल प्रल्हाद चव्हाण (वय २८, रा. साने चौक, चिखली) तसेच त्याच्यासोबत असलेला राजू कुमार गायकवाड (वय ३८, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) यांना वाहनासह ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेमुळे साईनाथनगर, यमुनानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!